
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.
जिल्ह्यात हरभरा आणि गव्हाची १.१७ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. एकूण उद्दिष्टांच्या ९५ टक्के क्षेत्र हे या दोन पिकांनी व्यापले आहे. यात हरभरा निम्याहून अधिक हेक्टरवर आहे. ६ हजार ५२४ हेक्टर अन्य पिकांचा समावेश आहे. आजवर रब्बीची ८०.४६ टक्के पेरणी आटोपली आहे.
जिल्ह्यात १ लाख ५४ हजार १० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले. यंदा अतिवृष्टी व हवामनातील बदलामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळेशेतकरी आधीच जेरीस आला असताना रब्बीच्या लागवडीचा वेग अत्यंत संथ दिसून आला. दिवाळीनंतर मात्र शासनाकडून नुकसान भरपाईची मदत, खरीपाचे उत्पन्न आल्यानंतर कोठे रब्बीच्या लागवडीला गती आली. खरीपातून झालेले नुकसान किमान रब्बीतून निघेल अशी आशा शेतकऱ्याला लागली आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या नगदी पिक म्हणून हरभऱ्याकडे शेतकऱ्याचा अधिक कल दिसून येत आहे. त्या पाठोपाठ गव्हाची अधिक मागणी असल्याने गव्हाची देखील लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे. सद्यास्थिती १ लाख ५४ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ९१४ हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. याची टक्केवारी ८०.४५ टक्के एवढी आहे. यामध्ये एकट्या हरभराची ८१ हजार ७८५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.त्या पाठोपाठ ३६ हजार हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमाकांवर कांदाची २,२४७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर मका १,७२१ हेक्टर, ज्वारी २०५ हेक्टर, मोहरी २४ हेक्टर, जवस ६ हेक्टर, करडी ५.६ हेक्टर आणि भाजीपाल्याची ५५८ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. यामहिन्या अखेरीसशंभर टक्के पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी