
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)।
गुरुवारी आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटचे आमदार व यंत्रणेसोबत नागपूर येथे बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. दुसरीकडे याच बैठकीत अतिदुर्गम हतरू आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी बेपत्ता आणि एकताई उपकेंद्राला मागील सात वर्षापासून टाळे लागले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. परिणामी, आदिवासी मध्य प्रदेशातील खेड्यांमधून उपचार देणाऱ्या कथित बंगाली डॉक्टरांच्या दारी जाऊन उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयात मेळघाटचे आमदार केवळराम काळेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सिकलसेल, रिक्त जागा, यासह मेळघाटातील आरोग्य सचिवांचा दौऱ्यातून पुढे आलेल्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. मेळघाटात आरोग्य यंत्रणा अजूनही कुचकामी ठरली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी करतात तरी काय, त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाईचा सूर यावेळी लागला.
आरोग्यमंत्री करणार पुन्हा दौरा
आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच मेळघाटचा दौरा केला होता. मात्र, त्यानंतर कुठलाच बदल आरोग्य यंत्रणेत झाला नाही. बैठकीत त्यांनी मेळघाट दौऱ्याचे संकेत दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी