
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
शासनाच्या शाळांमध्ये नावीन्यपूर्ण अध्यापन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शाळांचा गौरव करण्यासाठी संपर्क फाउंडेशनतर्फे ‘संपर्क टॉप टीचर अवॉर्ड्स ट्रॉफी वितरण कार्यक्रम २०२४–२५’ जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात उत्साहात पार पडला. या वेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट ६० शिक्षक व शाळांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘संपर्क टीव्ही एफएलएन’ कार्यक्रमांतर्गत उपलब्ध मल्टिमीडिया-आधारित शिक्षण साधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या एफएलएन (मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान) कौशल्यात लक्षणीय सुधारणा घडवून आणणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे होते. त्यांनी नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. संपर्क उपक्रमांमुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून मयुरी कुलकर्णी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) सोनाल मातकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील, डायट प्राचार्य सभाजान भाजन, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित दळवी यांनी केले, तर पालघर प्रोग्राम को-ऑर्डिनेटर अभिजित लोहकरे यांनी प्रास्ताविक केले.
संपर्क फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विनीत नायर यांनी गुणवत्तापूर्ण, आनंदमय व सहभागात्मक शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे सांगितले. सध्या जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांत संपर्क फाउंडेशनचे उपक्रम राबवले जात असून, आतापर्यंत ६०५ संपर्क टीव्ही व १ हजार ३० शैक्षणिक उपकरणे शाळांना देण्यात आली आहेत. राष्ट्रीय स्तरावर आठ राज्यांत हा उपक्रम राबवला जात असून, लाखो विद्यार्थी, शिक्षक व शाळांना त्याचा लाभ होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL