
नागपूर, 13 डिसेंबर, (हिं.स) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू असून, यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात आपल्या थेट, स्पष्ट आणि मुद्देसूद उत्तरांनी लक्ष वेधून घेतले. विधानपरिषद सदस्यांकडून विचारण्यात आलेल्या जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता ठाम भूमिका मांडली. त्यामुळे सभागृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
मंत्री कोकाटे हे स्वतः स्पोर्ट्स मॅन असल्याने त्यांच्या उत्तरांमध्ये स्पोर्टिंग स्पिरिट दिसून येते. याच गुणामुळे ते प्रत्येक प्रश्नाकडे समतोलपणे पाहून न्याय देतात, असे मत *भाजप आमदार प्रसाद लाड* यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याला सभागृहात उपस्थित सदस्यांकडून दाद मिळाली.
*भाजप आमदार निरंजन डावखेरे* यांनीही मंत्री कोकाटेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, त्यांनी दिलेली उत्तरे अत्यंत पॉझिटिव्ह असून राज्याचे स्पष्ट आणि ठोस धोरण त्यांनी सभागृहात मांडले, असे सांगितले.
तर *विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे* यांनी मंत्री कोकाटेंवरील विश्वास अधोरेखित करत, “तुम्ही थेट प्रश्न विचारा, कोकाटे साहेब उत्तर देतील. ते पूर्णपणे सक्षम आहेत,” असे ठामपणे नमूद केले.
यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही मंत्री कोकाटेंचे कौतुक करत, ते केवळ मंत्री नाहीत तर आमचे मार्गदर्शक मित्र असल्याचे सांगितले.
*शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे* यांनीही खरंतर गृहमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होतं, पण क्रीडामंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल समाधान व्यक्त करीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
क्रीडा क्षेत्रासह विविध जनहिताच्या प्रश्नांवर स्पष्ट, निर्भीड आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडत मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात आपली तुफानी खेळी सादर केली. त्यांच्या या कामगिरीला भाजप आमदारांनी कौतुकाची टाळी देत दाद दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर