
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।
नाशिकमध्ये येत्या १८ ते २१ डिसेंबर दरम्यान नरेडको आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ होत असून, या प्रदर्शनाच्या निमित्ताने नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील बदल, संधी आणि भविष्याचा वेध घेत होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. गेल्या जवळपास चार दशकांचा अनुभव असलेल्या ठक्कर यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील आमूलाग्र बदलांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.
जयेश ठक्कर सांगतात की, “मी गेली ३८ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. पूर्वी नाशिकमध्ये १ आरके, १ बीएचके किंवा जास्तीत जास्त २ बीएचके पर्यंतच मागणी मर्यादित होती. त्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती, एका घरात १० ते १५ सदस्य राहत असत. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नोकरीनिमित्त मुले बाहेरगावी, परदेशात जात आहेत. लहान कुटुंब पद्धती रूढ झाली असून चार-पाच सदस्यांच्या कुटुंबाला अधिक प्रशस्त घर हवे आहे. त्यामुळे सध्या ४ बीएचके ते ७ बीएचकेपर्यंतच्या फ्लॅट्सची मागणी सुद्धा झपाट्याने वाढत आहे. कोविडनंतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे.”
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास आराखडा तयार करण्यात आला असून, याकडे रिअल इस्टेट क्षेत्र आशादायी नजरेने पाहत असल्याचे ठक्कर स्पष्ट करतात. “सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकसाठी पर्वणी आहे. जगातील चार कुंभक्षेत्रांपैकी महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण नाशिक आहे. या निमित्ताने केंद्र, राज्य सरकार आणि नाशिक महापालिका मिळून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची पायाभूत गुंतवणूक करणार आहेत. रस्ते, पूल, वाहतूक, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा सुविधा वाढल्या की रिअल इस्टेटची मागणी आपोआप वाढते. नाशिक हे ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ शहर आहे, ही त्याची मोठी ताकद आहे.”
मुंबई आणि पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. याबाबत ठक्कर म्हणतात, “मुंबई व पुणे केवळ ३ ते ४ तासांच्या अंतरावर आहेत. समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद अडीच तासांवर, नागपूर साडेसहा तासांवर आले आहे. कनेक्टिव्हिटी वाढली की शहराचा विकास वेग घेतो. विशेष म्हणजे मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमधील घरांचे दर अजूनही परवडणारे आहेत.”
भारत माता योजना अंतर्गत प्रस्तावित नाशिक–चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेबाबत ते म्हणतात, “हा एक्सप्रेस वे अनेक राज्यांना जोडणारा ठरेल. वाया वाढवण बंदर असल्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रचंड वाढेल. सहा पदरी रस्त्यांमुळे प्रवास सुलभ होईल आणि नाशिकचा लॉजिस्टिक व औद्योगिक विकास झपाट्याने होईल.”
नाशिक–पुणे रेल्वे मार्गालाही ते अत्यंत महत्त्वाचे मानतात. “ही मागणी अनेक वर्षांची आहे. जर हा मार्ग संगमनेरमार्गे झाला तर नाशिक–पुणे अंतर अडीच ते तीन तासांत पार होईल. सिन्नर औद्योगिक पट्ट्याचा यामुळे मोठा विकास होईल. रोजगार वाढेल आणि गृहखरेदीला चालना मिळेल,” असे ठक्कर सांगतात.
नाशिकचा निसर्ग आणि विकास यांचा समतोलही ते अधोरेखित करतात. “नाशिकमध्ये २८ हून अधिक धरणे, पर्वतरांगा, हिरवाई आहे. शुद्ध हवा, समृद्ध पाणीपुरवठा यामुळे नाशिक इतर शहरांपेक्षा वेगळे ठरते. त्यामुळे बाहेरील लोकही येथे स्थायिक होण्यास उत्सुक आहेत.”
पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ सुवर्णसंधी असल्याचे ते आवर्जून सांगतात. “या एक्स्पोची खासियत म्हणजे ४.९९% प्रभावी व्याजदर योजना. बँक कर्ज ७.५ ते ८% दराने मंजूर करते, मात्र निवडक प्रोजेक्ट्समध्ये ग्राहक फक्त ४.९९% भरतील, उर्वरित व्याज बिल्डर भरेल. ही योजना PMAY लागू नसलेल्या ग्राहकांनाही फायदेशीर आहे.”
एअर कनेक्टिव्हिटीबाबत ते म्हणतात, “नाशिकहून सध्या दिल्ली, बेंगळुरू, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद अशा शहरांना थेट विमानसेवा आहे. लवकरच विमानतळाची क्षमता ८ ते १० पट वाढणार असून, याचा थेट फायदा रिअल इस्टेटला होईल.”
घरांच्या किमती वाढत असल्या तरी नाशिक अजूनही परवडणारे शहर असल्याचा ठाम विश्वास मुख्य समन्वयक जयेश ठक्कर व्यक्त करतात. “रेडीरेकनर दर, जमिनीचे भाव, बांधकाम साहित्य, मजुरी यामुळे दरवाढ होते. तरीही मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये आजही १५ ते २० लाखांत १ बीएचके फ्लॅट मिळतो, हे महत्त्वाचे आहे.”
कम्युनिटी हाऊसिंग आणि आलिशान घरांची मागणीही वाढत असल्याचे ते सांगतात. “गेटेड कम्युनिटी, स्मार्ट अमेनिटीज, उच्च इमारती याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. ४५ मजली इमारती असोत किंवा कोट्यवधींचे फ्लॅट्स – नाशिककर त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.”
संवादाच्या शेवटी ठक्कर ठामपणे म्हणतात, “नरेडको होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हा फक्त प्रदर्शन नसून नाशिकच्या रिअल इस्टेटचा भविष्यवेध आहे. ग्राहकांना योग्य पर्याय, पारदर्शक व्यवहार आणि मोठ्या सवलती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या विकासयात्रेत हा नरेडकोचा होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो मैलाचा दगड ठरणार आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV