
रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)।पनवेल तालुका पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले. ही रॅली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
केळवणे जे.टी. पासून केळवणे गाव, बस स्टॉप तसेच शाळा परिसरात ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाइन क्रमांक १०९३ संदर्भातील बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सागरी सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात सहभागी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सागर रक्षक, मच्छीमार बांधव व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ हेल्पलाइन क्रमांक १०९३ वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कासारभट व केळवणे परिसरात पोलिस पथकाने भेटी देत सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या रॅलीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली असून पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके