
* ७/१२ वरून खाजगी नाव हटले
* आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे 'जोगाई माहेरघर लेणी' अशी अधिकृत झाली नोंद
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)।
अंबाजोगाई शहराचे वैभव असलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या जोगाई सभामंडप (छोटा हत्तीखाना) येथील जागेच्या मालकी हक्काचा वाद अखेर संपुष्टात आलेला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सातबारा उताऱ्यावर लागलेले खाजगी नाव हटवून आता 'जोगाई माहेरघर लेणी' अशी अधिकृत शासकीय नोंद करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या बदलानंतर पुरातत्व विभागाने १२ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित कंत्राटदाराला या वास्तूचे जतन आणि दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या ऐतिहासिक वास्तूच्या जागेवर 'केरबा लक्ष्मण जिरे' असे खाजगी नाव लागल्याने मालकी हक्काचा वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे राज्य संरक्षित स्मारकाचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम बंद पडले होते.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार नमिता मुंदडा यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रशासकीय पातळीवरील हालचालींमुळे शासकीय यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अखेर महसूल विभागाने गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) मध्ये दुरुस्ती करून सदर जागा शासनाची म्हणजेच 'जोगाई माहेरघर लेणी' असल्याची नोंद केलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांनी गुरुवारी दि. १२ डिसेंबर रोजी संबंधित कंत्राटदार संस्थेला पत्र पाठवून काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पोलीस आणि महसूल प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबद्दल आ. मुंदडा यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाईच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या वास्तूचा विकास आता निर्विघ्नपणे पार पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis