
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।
: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला रामकाल पथ हा आध्यात्मिक कॉरिडॉर उभारण्यासाठी डिसेंबर २०२६ ची डेडलाइन महापालिका प्रशासनाला आहे. मात्र, जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने रामकाल पथ मार्च २०२६ पर्यंतच पूर्णत्वास नेण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यासंदर्भात तयारी सुरू आहे.
राजीव गांधी भवन मुख्यालयात रामकाल पथसंदर्भात मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली.पंचवटी, रामकुंड, गडकरी चौकपरिसरातील हनुमान मंदिर, काळाराम मंदिर, तसेच गंगाघाटावरील प्राचीन देवस्थाने या ठिकाणी रंगकाम,स्वच्छता आणि सौंदर्याकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिरांच्या भिंतींना भगवा व पिवळ्या रंगाच्या छटा देत पारंपरिक, तसेच आकर्षक सजावट करण्यात येत आहे. रामकुंड, सीतागुंफा व काळाराम मंदिर परिसरात रामायणातील आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथील प्रवेशद्वाराबरोबरच रामकुंड ते सरदार चौक, काळाराम मंदिर ते सीतागुंफा येथे दगडी फरशा बसविण्यात येणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत रामकाल पथ उभारला जात आहे. केंद्र सरकारकडून ९९ कोटी व राज्य शासनाकडून ४६ कोटी या प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत.
आतापर्यंत रामकाल पथमध्ये काय काय कामे झाली, याची माहिती आयुक्त खत्री यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार यांच्यासह सल्लागार उपस्थित होते. सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रामकाल पथसाठी गोदाकाठ परिसरातील मंदिरांच्या रंगरंगोटीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. रामायणातील आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV