

रायगड, 13 डिसेंबर (हिं.स.)। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारकडून होत असलेली दिरंगाई आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात रायगड जिल्ह्यातील विक्रम, मिनिडोअर व टॅक्सी चालक–मालकांचा संताप अलिबाग येथे उफाळून आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत चालक–मालकांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चाचे नेतृत्व संघटनाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून हजारो चालक–मालक या आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेने आरोप केला की, चालक–मालकांच्या गंभीर प्रश्नांवर सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे. १७ मार्च २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दोन ते तीन वर्षे उलटूनही एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२५ रोजी परिवहन आयुक्तांच्या दालनात बैठक आणि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी परिवहन मंत्र्यांकडे बैठक घेण्याची विनंती करूनही आजपर्यंत ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप करण्यात आला.
मोर्चेकऱ्यांच्या निवेदनात ग्रामीण भागातील विक्रम–मिनिडोअर वाहनांची वयोमर्यादा ५ वर्षांनी वाढवावी, ६+१ बदली मॉडेल उपलब्ध नसल्याने परवाना रद्द होऊन बेरोजगारी वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच दरवर्षी भरलेला VLTD डिव्हाईस नाकारून नव्याने डिव्हाईस बसवण्याच्या आदेशामुळे आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला. कर भरण्यास उशीर झाला तर तत्काळ दंड, पण शासनाकडील निर्णयांतील वर्षानुवर्षांची दिरंगाई यावर कोणतीही कारवाई नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
हिराकोट तलाव परिसरात मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास रायगडसह राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके