
नागपूर, 14 (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिरास भेट देत आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार तसेच विधानमंडळाचे सदस्य उपस्थित होते. डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे व्यवस्थाप्रमुख व ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री यांच्यासह स्वयंसेवकांनी उपस्थिती लावली.राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप व शिंदेसेनेचे मंत्री व आमदारांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरास भेट दिली. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरवर्षी अधिवेशन काळात आमदारांसाठी संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा अधिवेशनाचा कालावधी केवळ सात दिवसांचा असल्याने परिचय वर्ग होणार नसल्याची चर्चा होती. तथापि, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीमबाग येथे आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजल्यानंतर मंत्री व आमदार स्मृती मंदिर परिसरात दाखल झाले.यावेळी संघाकडून कोणतेही औपचारिक उद्बोधन करण्यात आले नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र भाजप व शिंदेसेनेचे काही मंत्री व आमदार या भेटीस अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी