
सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.)महापालिका निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा नसणार आहे. पण, कोणत्या पक्षाला किती जागा व कोणते प्रभाग कोणाला सोडायचे, यावर रविवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे.
भाजपने स्वबळाची तयारी केली असून, महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण एकत्रितपणे लढलो तर आपल्याला सर्वाधिक जागा मिळू शकतात, असा विश्वास महाविकास आघाडीला वाटत आहे. त्यानुसार शहरातील २६ प्रभागांमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारीच उमेदवार असतील, अशी सद्य:स्थिती आहे. त्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश गादेकर, रियाज मोमीन, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, वंचित बहुजनचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, मापकचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम असे प्रमुख उमदेवार असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड