

नवी दिल्ली, 17 डिसेंबर (हिं.स.)। बजाज ऑटोच्या अत्यंत लोकप्रिय पल्सर लाइनअपमधील दीर्घकाळापासून बाजारात टिकून असलेली मोटरसायकल बजाज पल्सर 220F आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारात दाखल झाली आहे. कंपनीने अधिकृतपणे 2026 बजाज पल्सर 220F लाँच केली असून, या अपडेटेड बाइकची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 1.28 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ड्युअल-चॅनल एबीएसचा समावेश, तर यासोबत काही सौंदर्यात्मक बदलही करण्यात आले आहेत.
बजाज पल्सर 220F ही मोटरसायकल प्रथम 2007 साली भारतीय बाजारात लाँच करण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे या मॉडेलमध्ये फारसे मोठे बदल करण्यात आले नव्हते. केवळ उत्सर्जन नियमांनुसार आणि किरकोळ अपडेट्सपुरतेच बदल मर्यादित होते. मात्र, या नव्या अपडेटमुळे पल्सर 220Fला नवसंजीवनी मिळाली आहे.
लेटेस्ट अपडेटनुसार, बजाज पल्सर 220Fमध्ये नवीन ग्राफिक्स देण्यात आले असून दोन नवीन रंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सॉफ्ट गोल्ड अॅक्सेंटसह ब्लॅक कलर आणि ब्लॅक बेसवर ग्रीन शेड्ससह ऑरेंज रंगाचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठा बदल म्हणजे ड्युअल-चॅनल एबीएसचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे ही मोटरसायकल अधिक सुरक्षित झाली आहे.
या बाइकमध्ये काही युनिट्समध्ये युरोग्रिप एटीटी 1150 टायर्स देण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी अजूनही एमआरएफ टायर्स वापरले जात असल्याचे दिसून येते. यावरून टायर फिटमेंट उपलब्धतेनुसार बदलू शकते, असे संकेत मिळतात. बजाज पल्सर 220Fमध्ये ब्लूटूथ-सपोर्ट असलेला एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, जो सध्या विक्रीत असलेल्या इतर पल्सर मॉडेल्समध्येही पाहायला मिळतो. मात्र, यामध्ये अजूनही गिअर पोजिशन इंडिकेटर देण्यात आलेला नाही.
इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, बजाज पल्सर 220Fमध्ये कोणताही यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 220cc एअर/ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 20.4 एचपीची पॉवर आणि 18.5 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.
वयाच्या मानाने जुनी असली तरी, बजाज पल्सर 220F ही आजही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पल्सर मोटरसायकलींपैकी एक आहे. नव्या ड्युअल-चॅनल एबीएस अपडेटमुळे या बाइकचे आकर्षण अधिक वाढले असून, तिची बाजारातील उपस्थिती आणखी काही काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे. अधिक माहिती आणि उपलब्धतेसाठी इच्छुक ग्राहकांनी आपल्या नजीकच्या बजाज डीलरशिपशी संपर्क साधावा, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule