
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। भारतातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडिया (Vi) ने आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्ससोबतची भागीदारी अधिक मजबूत करत प्रीपेड ग्राहकांसाठी रिचार्ज-लिंक्ड मोबाईल चोरी आणि नुकसान विमा योजना सुरू केली आहे.
आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ही योजना उपलब्ध असून, यामुळे Vi आपल्या डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. नव्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि सरासरी महसूल प्रति युजर (ARPU) वाढवणे हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश असून, यामुळे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या मोठ्या स्पर्धकांशी स्पर्धा अधिक प्रभावीपणे करता येईल, असा कंपनीचा विश्वास आहे.
ही नवी योजना Vi च्या तीन प्रीपेड प्लॅन्समध्ये देण्यात आली आहे. 61 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची हँडसेट विमा वैधता असून 15 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळतो. 201 रुपयांच्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची विमा वैधता आणि 30 दिवसांसाठी 10 जीबी डेटा आहे, तर 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल 365 दिवसांची म्हणजेच एक वर्षाची विमा वैधता देण्यात आली असून त्यातही 30 दिवसांसाठी 10 जीबी डेटा मिळतो. या तिन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतचा मोबाईल विमा कव्हर मिळणार आहे.
Vi च्या म्हणण्यानुसार, मोबाईल हरवणे किंवा चोरी होणे ही ग्राहकांची मोठी चिंता असून पारंपरिक विमा पॉलिसींमध्ये सहसा याचा समावेश नसतो. ही नवी योजना हीच उणीव भरून काढते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मे 2025 च्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 82.55 टक्के कुटुंबांकडे किमान एक स्मार्टफोन आहे. उद्योग अहवालांनुसार, हँडसेट विमा बाजार यंदा सुमारे 2.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, तो दरवर्षी जवळपास 14 टक्क्यांनी वाढत आहे. मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनची बदली करण्याचा खर्च साधारणतः 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत जातो, अशा परिस्थितीत ही योजना ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
कंपनीने सांगितले की, रोजच्या प्रीपेड रिचार्जमध्ये विमा कव्हर समाविष्ट करून उच्च प्रीमियम, सोयीचा अभाव आणि उपलब्धतेशी संबंधित बाजारातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पारंपरिक विमा योजनांच्या तुलनेत ही योजना अधिक परवडणारी आहे, कारण विम्याचा खर्च रिचार्ज पेमेंट्समध्ये छोट्या भागांमध्ये विभागला गेला आहे. याशिवाय, Vi क्लेम प्रक्रियेसाठी डिजिटल-प्रथम आणि सुलभ सुविधा देणार असून, विद्यमान ग्राहक डेटाचा वापर करून कागदपत्रांची गरज कमी केली जाणार आहे आणि प्रक्रिया जलद केली जाणार आहे.
दरम्यान, Vi च्या प्रीपेड सेगमेंटमधील इतर नाविन्यपूर्ण ऑफर्समध्ये ‘हीरो अनलिमिटेड’ सूट, अनलिमिटेड हाय-स्पीड नाईट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि ऑन-डिमांड एक्स्ट्रा डेटा यांचा समावेश आहे. कंपनीने सुपर हीरो प्लॅन्सद्वारे 12 तास अनलिमिटेड डेटा आणि नॉनस्टॉप हीरो प्लॅन्सद्वारे 24 तास अनलिमिटेड डेटा देण्याची सुविधाही सुरू केली आहे. मोबाईल सुरक्षेसोबतच परवडणाऱ्या किमतीत अतिरिक्त फायदे देणारी ही नवी विमा योजना Vi ला दूरसंचार बाजारात अधिक मजबूत स्थान मिळवून देईल, असा कंपनीला विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule