
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन प्रीमियम टॅबलेट ‘लेनोवो आयडिया टॅब प्लस’ लाँच केला आहे. ऑगस्टमध्ये सादर करण्यात आलेल्या आयडिया टॅबपेक्षा हा टॅबलेट अधिक प्रीमियम फीचर्ससह सादर करण्यात आला असून तो विशेषतः विद्यार्थी आणि जनरेशन झेड यांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. लर्निंग, क्रिएटिव्हिटी आणि एंटरटेनमेंटसाठी उपयुक्त ठरणारी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये या टॅबलेटमध्ये देण्यात आली आहेत.
लेनोवो आयडिया टॅब प्लस भारतात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह वाय-फाय आणि 5G सपोर्ट असलेल्या मॉडेलची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेरिएंट्ससोबत टॅब पेन स्टायलस बॉक्समध्येच दिला जात आहे. हा टॅबलेट फक्त ‘लूना ग्रे’ रंगात उपलब्ध असून सध्या प्री-ऑर्डरसाठी खुला आहे. 22 डिसेंबरपासून लेनोवोची अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉनवर याची विक्री सुरू होणार आहे.
या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याला 2.5K रिझॉल्यूशन आणि 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. 800 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे उजेडातही स्क्रीनवरील कंटेंट स्पष्टपणे दिसतो. परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 6400 चिपसेट देण्यात आला असून तो 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसोबत येतो. हा टॅबलेट अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
फोटोग्राफीसाठी आयडिया टॅब प्लसमध्ये मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि समोर 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने वाय-फाय व्हेरिएंटमध्ये 802.11 a/b/g/n/ac सपोर्ट असून 5G मॉडेलमध्ये फास्ट 5G कनेक्टिव्हिटी मिळते. याशिवाय ब्ल्यूटूथ 5.2 ची सुविधाही देण्यात आली आहे.
या टॅबलेटमध्ये 10,200 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी असून ती 45 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मेटल बॉडी आणि स्लिम डिझाइनमुळे हा टॅबलेट मजबूत आणि पोर्टेबल आहे. लेनोवो नोटपॅड, सर्कल टू सर्च, जेमिनी आणि टॅब पेन स्टायलस सपोर्टसारखी एआय-आधारित वैशिष्ट्ये यात देण्यात आली असून त्यामुळे नोट्स घेणे, स्केचिंग आणि क्रिएटिव्ह कामे अधिक सोपी होतात. लेनोवोच्या मते, या किंमत श्रेणीत 5G सपोर्ट आणि उच्च रॅम-स्टोरेज कॉम्बिनेशन देणारा हा एक वेगळा आणि आकर्षक पर्याय ठरतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule