
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान वेगाने विस्तारत असून, या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआय आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. ओपनएआय आपला लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी याला केवळ एक अॅप किंवा प्लॅटफॉर्म न ठेवता थेट एआय ऑपरेटिंग सिस्टममध्ये रूपांतरित करण्याची योजना आखत आहे.
या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत कंपनीने ग्लेन कोट्स यांची Head of App Platform म्हणून नियुक्ती केली आहे. ग्लेन कोट्स यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ओपनएआय मध्ये सामील झाल्याची माहिती दिली असून, चॅटजीपीटीला ऑपरेटिंग सिस्टमसारखे विकसित करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी ते Shopify मध्ये Vice President आणि Head of Product या पदावर कार्यरत होते. ओपनएआय मध्ये ते चॅटजीपीटीचे प्रमुख निक टर्ली यांना रिपोर्ट करणार आहेत.
सध्या चॅटजीपीटी एक अॅप आणि प्लॅटफॉर्म म्हणून काम करत आहे. युजर्स याच्या मदतीने माहिती शोधणे, लेखन करणे, कोडिंग करणे अशा विविध गोष्टी करू शकतात. अलीकडेच ओपनएआय ने ChatGPT Apps हे नवे फीचर सुरू केले असून, यामुळे Adobe, Canva, Zillow यांसारखे थर्ड पार्टी अॅप्स थेट चॅटजीपीटीच्या आत वापरता येतात. त्यामुळे वेगवेगळे अॅप्स उघडण्याची गरज न राहता, एकाच ठिकाणी अनेक कामे करता येऊ लागली आहेत.
TechCrunch शी बोलताना निक टर्ली यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत चॅटजीपीटीला अशा प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले जाईल, जिथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अॅप उपलब्ध असेल. लेखन, कोडिंग किंवा एखाद्या सेवा-उत्पादनाशी जोडण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्स चॅटजीपीटी मध्येच असतील. कोणतेही ऑपरेटिंग सिस्टम यशस्वी होण्यासाठी हार्डवेअर, युजर आणि अॅप्स यांच्यातील दुवा महत्त्वाचा असतो. चॅटजीपीटी कडे आधीच युजर इंटरफेस, एआय एजंट्स, सर्च सिस्टम आणि डेटा लेयर उपलब्ध आहेत. सध्या हार्डवेअर इंटिग्रेशन ही एकमेव उणीव मानली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर ओपनएआय आणि प्रसिद्ध डिझायनर Jony Ive यांच्यातील भागीदारी महत्त्वाची ठरते. या सहकार्याअंतर्गत एआय आधारित हार्डवेअर डिव्हाइस 2027 पर्यंत सादर होण्याची शक्यता आहे. ओपनएआयकडे आधीच मजबूत डेटा सेंटर्स, विविध अॅप पार्टनरशिप्स आणि प्रगत एआय तंत्रज्ञान आहे. हे सर्व घटक एकत्र आले, तर चॅटजीपीटी जगातील पहिले पूर्ण एआय ऑपरेटिंग सिस्टम ठरू शकते. मात्र, यासाठी कंपनीने अद्याप कोणतीही ठोस वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule