
धुळे, 17 डिसेंबर (हिं.स.) | धुळे महापालिका निवडणुक विजयासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कमळ विजय यात्रा, अभियानाला वाजत गाजत प्रारंभ करत मिल परिसरातून पश्चिम मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह सर्व ईच्छुकांनी भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा केला आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या आदेशानुसार धुळ्यात पहिली कमळ विजय यात्रा प्रचार फेरीचा शुभारंभ संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मदनलालजी मिश्रा सर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
डफ ताशाच्या तालावर जंगी प्रचार फेरी मिलपरिसरातील गल्ली बोळातून सर्वच वसाहतींमधून जात नागरीकांना कमळ चिन्हावर भाजपला विजयी करण्याचेच आवाहन या रॅलीव्दारे केले गेले. धुळे महापालिकेची निवडणुक जाहिर झाली असून सत्ताधारी भाजपाने प्रचाराला थेट प्रारंभ केला आहे.
शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी कालच ईच्छुक उमेदवार आणि पदाधिकार्यांच्या बैठकीत भाजपाचा ५५ प्लस हा एकच नारा असून, कमळ विजय यात्रेच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करा. पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या विजयासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा. आपसांतील हेवेदावे बाजूला सारून पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी झटा. कमळ विजय यात्रा घरोघरी पोहोचवा. असे आदेश दिले होते. या आदेशाचे पालक करत मिल परिसरातील प्रभाग क्रमांक १७ मधून पहिली कमळ विजय यात्रा वाजत गाजत काढण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर