
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। पिल्लई विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, वास्तुकला, वाणिज्य, डिझाइन व व्यवस्थापन शाखांचा समावेश असलेल्या ‘मेकरथॉन ७.० – विचार करा, शिका, तयार करा’ या भव्य नाविन्यपूर्ण उपक्रमाचे डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पसमध्ये उत्साहात आयोजन करण्यात आले. ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमात ठाणे, कल्याण, पनवेल, नवी मुंबई व मुंबई परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील १८९ आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन संघांचे एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
मेकरथॉन ७.० मुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक नवोपक्रम आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले. प्रत्यक्ष समस्या सोडविताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संकल्पना प्रत्यक्ष जीवनातील उपयोगांशी जोडल्या. यामुळे त्यांची सर्जनशीलता, तार्किक विचारसरणी, निर्णयक्षमता, संवाद कौशल्ये आणि संघभावना अधिक बळकट झाली. पिल्लई विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘करून शिकणे’ या तत्त्वाचा या उपक्रमातून ठळक प्रत्यय आला.विद्यार्थ्यांनी आपल्या वर्कस्टेशनवर कल्पनांचे विचारमंथन करत त्यांना प्रत्यक्ष कार्यरत नमुन्यांमध्ये रूपांतरित केले व तज्ज्ञ परीक्षकांसमोर सादरीकरण केले. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या वेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई यांच्या हस्ते २ लाख रुपयांची रोख पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्रे विजेत्यांना प्रदान करण्यात आली. विविध गटांतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान, डिझाइन व बिझाथॉन प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.मेकरथॉन ७.० ने अनुभवात्मक शिक्षणाद्वारे नावीन्य, सहकार्य आणि उद्योगसिद्ध कौशल्ये विकसित करण्याबाबत पिल्लई विद्यापीठाची ठाम वचनबद्धता अधोरेखित केली असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके