
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।
मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार विजयाताई पत्तेवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित 'महाविजय संकल्प सभेत' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
1200 वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेली मुखेड ही एक ऐतिहासिक अशी नगरी आहे. दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी असून एक कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार डॉ. तुषार राठोड मुखेडला लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी विजयाताई पत्तेवार यांच्या रूपाने एक सुशिक्षित असा उमेदवार दिला आहे. या दोघांच्या पाठीशी सरकार उभे आहे.
मुखेड शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव, भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव तसेच एमआयडीसीची मागणी या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील. मुखेड शहराच्या नागरी सुविधा व सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. बोधन–मुखेड–लातूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मुखेडच्या जनतेला आवाहन करतो की, येत्या 20 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. पुढची 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ.
यावेळी खासदार अशोक चव्हाण आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार जितेश अंतापुरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis