गुगलचा ‘डार्क वेब रिपोर्ट्स’ फीचर होणार बंद
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। गुगल आपल्या एक महत्त्वाच्या सिक्युरिटी फीचरला बंद करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ‘डार्क वेब रिपोर्ट्स’ हे फीचर फेब्रुवारी २०२६ पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या फीचरचा
Google


मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। गुगल आपल्या एक महत्त्वाच्या सिक्युरिटी फीचरला बंद करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ‘डार्क वेब रिपोर्ट्स’ हे फीचर फेब्रुवारी २०२६ पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या फीचरचा उद्देश वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाली आहे का, यावर लक्ष ठेवणे हा होता.

डार्क वेब रिपोर्ट्स फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा ई-मेल आयडी, मोबाईल नंबर तसेच इतर वैयक्तिक तपशील डार्क वेबवर स्कॅन केले जात होते. कुठेही डेटा लीक झाल्याचे आढळल्यास गुगल संबंधित वापरकर्त्याला तात्काळ अलर्ट पाठवत होते. सुरुवातीला हे फीचर केवळ Google One सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध होते, मात्र २०२४ मध्ये ते सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत करण्यात आले.

आता गुगलने अधिकृतपणे जाहीर केले आहे की १५ जानेवारी २०२६ पासून नवीन डार्क वेब ब्रीच स्कॅन थांबवण्यात येतील. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘डार्क वेब रिपोर्ट्स’ फीचर पूर्णपणे बंद केले जाईल. याच दिवशी सर्व वापरकर्त्यांचा संबंधित डेटा कायमस्वरूपी डिलीट केला जाणार आहे.

वापरकर्त्यांना हवे असल्यास आपली मॉनिटरिंग प्रोफाइल आधीच डिलीट करता येणार आहे. यासाठी Google Account मध्ये जाऊन Dark Web Report पेज उघडावे लागेल. त्यानंतर ‘Edit Monitoring Profile’ या पर्यायावर क्लिक करून ‘Delete Monitoring Profile’ निवडल्यास प्रोफाइल डिलीट होईल आणि त्या क्षणापासून या फीचरचा वापर करता येणार नाही.

हे फीचर बंद करण्यामागचे कारणही गुगलने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या मते, वापरकर्त्यांच्या फीडबॅकमधून असे समोर आले की हे टूल फक्त माहिती देत होते, मात्र डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत स्पष्ट आणि कृतीयोग्य मार्गदर्शन देत नव्हते. त्यामुळे आता गुगल अशा टूल्सवर लक्ष केंद्रित करणार आहे, जे वापरकर्त्यांना डेटा संरक्षणासाठी अधिक प्रॅक्टिकल आणि स्पष्ट मार्गदर्शन देतील.

दरम्यान, डार्क वेब रिपोर्ट्स फीचर बंद होत असले तरी गुगलने वापरकर्त्यांना काही इतर सिक्युरिटी टूल्स वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये Security Checkup, Google Password Manager, Passkey आणि ‘Results about you’ या फीचरचा समावेश आहे. ‘Results about you’ टूलच्या मदतीने वापरकर्ते गुगल सर्चमधून आपला फोन नंबर, पत्ता यांसारखी वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती करू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande