


रायगड, 17 डिसेंबर (हिं.स.)किहीम ग्रामपंचायत सरपंच पिंट्या गायकवाड व अलिबाग तालुका बैलगाडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने किहीम समुद्रकिनारी रायगड जिल्ह्यातील बैलगाडी सम्राट स्व. निवास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम फेरीत रहाटले येथील संदीप शंकर म्हात्रे यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रसन्न सुर्वे यांच्या बैलगाडीने द्वितीय आणि राज सुर्वे यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवला.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किहीम ग्रामपंचायत सरपंच पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, अलिबाग तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष दिलीप राऊत, उपाध्यक्ष अजय म्हात्रे यांच्यासह रमेश म्हात्रे, संजना पाटील, किहीमचे पोलीस पाटील प्रीती गायकवाड, ज्येष्ठ नागरिक सुधीर गायकवाड, उमेश दातार, पप्या दळवी, शशी पेडणेकर, नरेन म्हात्रे, अभिषेक पेडणेकर, अमित देवरुखकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैलगाडा शर्यतीत एकूण १२३ बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता. सात गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली असून प्रत्येक गटात चुरशीच्या व थरारक लढती पाहायला मिळाल्या. बैलगाड्यांच्या वेग, चालकांचे कौशल्य आणि बैलांची ताकद यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या ऐतिहासिक व पारंपरिक खेळाचा आनंद घेण्यासाठी अलिबाग व मुरूड तालुक्यासह परिसरातील हजारो शौकिनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षिततेची व्यवस्था आणि पारंपरिक खेळाला मिळालेला प्रतिसाद यामुळे किहीम येथील ही बैलगाडा शर्यत यशस्वी व संस्मरणीय ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके