आयआयटी मुंबईच्या संशोधनाने जागतिक टेक क्षेत्रात नवा अध्याय सुरू
* वीज आणि पाण्याची होणार मोठी बचत मुंबई, १७ डिसेंबर (हिं.स.) : भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. ''आर्टिफिशियल इंटेलिजन्स''च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी
आयआयटी मुंबई


* वीज आणि पाण्याची होणार मोठी बचत

मुंबई, १७ डिसेंबर (हिं.स.) : भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जागतिक पायाभूत सुविधा कंपनी 'व्हर्टिव्ह' यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ पर्यंत हाय-टेक चिप्सचा वीज वापर १,२०० वॅट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असताना, हे नवे तंत्रज्ञान डेटा सेंटर्सना 'ओव्हरहीटिंग'पासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

या भागीदारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी मुंबईने विकसित केलेले 'रोटेटिंग कॉन्टॅक्टिंग डिस्क' हे पेटंट तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान एअर कंडिशनिंगसाठी लागणारी अवाढव्य वीज वाचवण्यास मदत करते. यामुळे डेटा सेंटरची कार्यक्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार असून, विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच डेटा सेंटर चालवण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

या प्रकल्पाची सुरुवात व्हर्टिव्हने डिझाइन केलेल्या ४० किलोवॅट क्षमतेच्या कूलिंग सिस्टमपासून होणार आहे. या प्रणालीची पहिली चाचणी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत होईल आणि त्यानंतर व्हर्टिव्हच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पात तिचे अंतिम परीक्षण केले जाईल. हे तंत्रज्ञान केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगांत वापरले जाणार असल्याने 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेला मोठी ताकद मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि व्हर्टिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभासिस मजुमदार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे केवळ तंत्रज्ञान विकसित होणार नाही, तर भारतीय विद्यार्थ्यांना भविष्यातील 'थर्मल इंजिनीअरिंग'चे प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेत. जेव्हा शैक्षणिक संशोधन आणि जागतिक दर्जाचा औद्योगिक अनुभव एकत्र येतो, तेव्हा भारताची डिजिटल प्रगती रोखणे अशक्य आहे, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande