
जेरुसलेम , 17 डिसेंबर (हिं.स.)।इस्रायलने मंगळवारी कॅनडाहून आलेल्या एका खासगी प्रतिनिधीमंडळाला कब्ज्यातील वेस्ट बँकमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. या प्रतिनिधीमंडळात कॅनडाच्या संसदेचे सहा सदस्य (खासदार) सहभागी होते. कॅनडामधील इस्रायलच्या दूतावासाने सांगितले की या गटातील काही सदस्यांचे ‘इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाइड’ या संस्थेशी संबंध असल्याचे समोर आल्यामुळे त्यांना रोखण्यात आले. इस्रायल या संस्थेला दहशतवादी संघटना मानतो.
या प्रकरणावर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत सांगितले की कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांशी, विशेषतः खासदारांशी, करण्यात आलेल्या या वागणुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याचबरोबर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाच्या ओंटारियोमधील खासदार इकरा खालिद यांनी सीमेजवळील इस्रायली सुरक्षारक्षकांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्या स्वतः या प्रतिनिधीमंडळाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायली सीमा अधिकाऱ्यांनी आपल्याला अनेक वेळा धक्का दिल्याचा दावा त्यांनी केला.
या घटनेबाबत इकरा खालिद यांनी सांगितले की, जेव्हा त्या आपल्या प्रतिनिधीमंडळातील एका सदस्याला मदत करण्यासाठी पुढे गेल्या, तेव्हा त्यांना धक्का देण्यात आला. ही घटना जॉर्डन आणि इस्रायलच्या कब्ज्यातील वेस्ट बँक यांच्यामधील एलेनबी बॉर्डर क्रॉसिंग येथे घडली. अधिकाऱ्यांना आपण खासदार आहोत, याची पूर्ण जाणीव होती, कारण आपल्या जवळ विशेष सरकारी पासपोर्ट होता, जो सामान्य कॅनडियन पासपोर्टपेक्षा वेगळा दिसतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर इस्रायली दूतावासाने स्पष्ट केले की ज्या व्यक्ती किंवा संघटनांचे घोषित दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, अशांना इस्रायल आपल्या देशात प्रवेशाची परवानगी देणार नाही. संबंधित प्रतिनिधीमंडळाला ‘कॅनडियन–मुस्लिम व्होट’ या संघटनेने प्रायोजित केले होते. हा गट वेस्ट बँकमधील विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांची भेट घेणार होता. इस्रायलचे म्हणणे आहे की या संघटनेला बहुतेक निधी इस्लामिक रिलीफ कॅनडाकडून मिळतो, जी संस्था इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाइडशी संलग्न आहे. इस्रायल या संपूर्ण नेटवर्कला दहशतवादी संघटना मानतो.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम्सने म्हटले आहे की इस्रायलने कॅनडाच्या खासदारांना प्रवेश नाकारणे हे पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. ब्रिटिश कोलंबियामधील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदार जेनी क्वान यांनी सांगितले की संपूर्ण प्रतिनिधीमंडळाकडे वेस्ट बँकमध्ये प्रवेशासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल परवानगी होती; मात्र आम्ही पोहोचण्याच्या दिवशीच ती रद्द करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode