ट्रम्प प्रशासनाचा व्हेनेझुएलाच्या तेलवाहतुकीवर पूर्ण बंदी, चीनला फटका
वॉशिंग्टन , 17 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचा फटका चीनला बसू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच तेथून बाहेर जाणाऱ्या सर्व निर्बंधित
अमेरिका - व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे चीनला फटका बसण्याची शक्यता


वॉशिंग्टन , 17 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचा फटका चीनला बसू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच तेथून बाहेर जाणाऱ्या सर्व निर्बंधित तेल टँकरांना पूर्णपणे रोखण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की आता ते व्हेनेझुएला सरकारकडे परदेशी दहशतवादी संघटना म्हणून पाहत आहेत. या आदेशानंतर व्हेनेझुएलाच्या तेलवाहू जहाजांची हालचाल पूर्णतः थांबणार आहे.

ट्रम्प म्हणाले,“व्हेनेझुएला आता दक्षिण अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नौदल ताफ्याने वेढले गेले आहे. हा नौदल ताफा इतका वाढवला जाईल, जितका व्हेनेझुएलाने यापूर्वी कधीच पाहिला नसेल. जोपर्यंत त्यांनी अमेरिकेकडून चोरलेले सर्व तेल आणि जमीन परत दिलेली नाही, तोपर्यंत ही स्थिती कायम राहील. मादुरो यांचे बेकायदेशीर सरकार या तेलाचा वापर स्वतःला वित्तपुरवठा करण्यासाठी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, हत्या आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्यांसाठी करत आहे. दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करीमुळेच व्हेनेझुएला सरकारला परदेशी दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे.”

अमेरिकेच्या मागील प्रशासनावर टीका करत ट्रम्प म्हणाले, “कमकुवत बायडन प्रशासनाच्या काळात मादुरो सरकारने जे बेकायदेशीर स्थलांतरित आणि गुन्हेगार अमेरिकेत पाठवले होते, त्यांना आता वेगाने व्हेनेझुएलात परत पाठवले जात आहे. अमेरिका गुन्हेगारांना, दहशतवाद्यांना किंवा कोणत्याही देशाला आमच्या राष्ट्राची लूट, धमकी किंवा नुकसान करण्याची परवानगी देणार नाही. तसेच कोणत्याही शत्रू देशाला आमचे तेल किंवा आमची जमीन बळकावण्याची मुभा दिली जाणार नाही.”

चीन दररोज व्हेनेझुएलाकडून सुमारे 6 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करतो. याच आधारावर चीनने निकोलस मादुरो यांच्या सरकारला अब्जावधी डॉलर्सचे कर्ज दिले आहे. चीनच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी सुमारे 4 टक्के तेल व्हेनेझुएलाकडून पुरवले जाते. हे तेल व्हेनेझुएला चीनला तुलनेने स्वस्त दरात देते.

गेल्या काही वर्षांपासून चीन मादुरो सरकारचा प्रमुख सहकारी राहिला आहे. याच कारणामुळे या महिन्याच्या सुरुवातीला चीनने व्हेनेझुएलाच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाला विरोध असल्याचे जाहीर केले होते. हा थेट इशारा अमेरिकेकडे होता. चीनने व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तसेच, चीनने दिलेले कर्ज व्हेनेझुएला तेल निर्यातीच्या माध्यमातून फेडत राहिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande