
इस्लामाबाद, 17 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तुरुंगातील स्थितीबाबत त्यांच्या मुलांनी गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचे पुत्र कासिम आणि सुलेमान यांनी सांगितले की, वडिलांना तुरुंगात “मानसिक छळ” सहन करावा लागत असून त्यांना एका “डेथ सेल”मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही कदाचित वडिलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, अशी भीती वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या एका न्यूजवरील कार्यक्रमात बोलताना दोघांनी सांगितले की ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्याशी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. कासिम यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या वडिलांना एकांतवासात ठेवण्यात आले असून, त्यांना घाणेरडे पाणी दिले जाते. ते अशा कैद्यांमध्ये आहेत, जे हिपॅटायटिसमुळे मृत्युमुखी पडत आहेत. “स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि ते पूर्णपणे एकटे पाडले गेले आहेत,” असे कासिम म्हणाले.
कासिम यांनी पुढे सांगितले की आता कोणताही मार्ग दिसत नाही. “आम्ही आशा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. कदाचित आम्ही त्यांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, अशी भीती वाटते,”. त्यांनी आरोप केला की इम्रान खान यांच्यावर मानसिक छळाचे विविध प्रकार वापरले जात असून, तुरुंगातील रक्षकांनाही त्यांच्याशी बोलण्याची परवानगी नाही.
सुलेमान यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे, तिला “डेथ सेल” म्हटले जाते आणि तेथे ते दररोज 23 तास राहतात. अलीकडेच लष्कराच्या प्रवक्त्याने इम्रान खान आता पूर्णपणे एकांतवासात असल्याची घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले.
सुलेमान यांनी आरोप केला की त्यांच्या वडिलांना ज्या परिस्थितीत ठेवण्यात आले आहे, त्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मानकांशी सुसंगत नाहीत. हे आरोप इम्रान खान यांच्या बहिणी उजमा खानुम यांच्या विधानांशीही जुळतात. या महिन्याच्या सुरुवातीला तुरुंगात भेट घेतल्यानंतर त्यांनी इम्रान खान मानसिक दबाव आणि एकांतवासाला सामोरे जात असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. राज्याच्या भेटवस्तूंची बेकायदेशीर विक्री केल्याच्या प्रकरणात त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र इम्रान खान यांचा दावा आहे की त्यांच्याविरोधातील सर्व खटले हे राजकीय सूडबुद्धीचा भाग असून, 2022 मध्ये संसदेत अविश्वास ठरावाद्वारे सत्तेतून हटवल्यानंतर हे प्रकार सुरू झाले.
कासिम यांनी स्पष्ट केले की त्यांचे वडील कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत. ते म्हणाले की, “ते कधीही आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगात सोडून स्वतः बाहेर येणार नाहीत. पाकिस्तानला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते या परिस्थितीत राहणे पसंत करतील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode