जळगाव - शरद पवार राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
जळगाव, 17 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१६ डिसेंबर) झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉक आऊट केला, तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने स्वबळाचा नारा दिला. अशात आज
जळगाव - शरद पवार राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा


जळगाव, 17 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१६ डिसेंबर) झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉक आऊट केला, तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने स्वबळाचा नारा दिला. अशात आज, (दि.१७ डिसेंबर) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा देत, सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. आकाशवाणी चौक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवारी (दि.१६ डिसेंबर) झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ३२ जागांची मागणी केली, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने १० ते १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यात उद्धव सेना व शरद पवार गटाच्या काही उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली. जागा वाटपाच्या मुद्द्यापेक्षा या बैठकीत ज्या प्रभागांवर उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून दावा करण्यात आला, त्याच प्रभागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दावा करण्यात आला. मात्र, दोन्हीही पक्षांकडून त्या जागांबाबत शेवटपर्यंत तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगितले.आजही जनतेच्या मनात शरद पवार असून, तेच जनतेचे नेते आहेत. जळगाव महापालिका कोणाच्या हातात द्यायची हे जनतेला माहिती आहे. रस्ते, गटारी, पाणी समस्या, यासह विविध प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या या निर्णयाचा येत्या काळात कोणाला फायदा अन् कोणाला फटका? बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तसेच पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे व तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या बैठकीकडे पक्षातील जिल्ह्याचे एकमेव नेते एकनाथ खडसे यांनी पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande