नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी : आयुक्त
नंदुरबार, 17 डिसेंबर, (हिं.स.) नंदुरबारसारख्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यांतील नागरिकांनाही विहित कालावधीत शासकीय सेवामिळाव्यात, यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोग सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आयोग सदैव कटिबद
नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी : आयुक्त


नंदुरबार, 17 डिसेंबर, (हिं.स.) नंदुरबारसारख्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यांतील नागरिकांनाही विहित कालावधीत शासकीय सेवामिळाव्यात, यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोग सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण

करण्यासाठी आयोग सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्त श्रीमती

चित्रा कुलकर्णी यांनी केले. नाशिक येथील राज्य सेवा हक्क आयोग कार्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपसचिव सुनिल जोशी, नायब तहसीलदार सचिन पोतदार, कक्ष अधिकारी उदय काण्णव, ध.र. पुराडउपाध्ये

यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी

अंमलबजावणीसाठी नाशिकसह राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयुक्तांची

कार्यालये कार्यरत आहेत. या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा देण्याचा प्रयत्न

करण्यात येत आहे. लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक विभागातील सर्व जिल्हे राज्यात

पहिल्या सहा क्रमांकांत आहेत, ही गेल्या चार वर्षांत केलेल्या कामकाजाची पावती असल्याचेही त्यांनी नमूद

केले.

कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यात सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची

विशेष दखल घेण्यात आली. अतिदुर्गम भागातील नागरिकांना विहित कालावधीत अधिसूचित सेवा उपलब्ध

करून देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अक्राणी येथील

तत्कालीन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, माहिती तंत्रज्ञान विभाग, नंदुरबारचे जिल्हा समन्वयक योगेश

पाटील तसेच आयोगाच्या कार्यालयातील महेंद्र गावित यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी व तत्कालीन तहसीलदार श्री. सपकाळे यांच्यावतीने हे प्रशस्तीपत्र जिल्हा समन्वयक

श्री. पाटील यांनी स्वीकारले.

शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचित करण्यात आलेल्या लोकोपयोगी सेवा व विविध दाखले ठराविक

कालावधीत आणि माफक शुल्कात मिळावेत, यासाठी नागरिकांनी राज्य शासनाच्या “आपले सरकार” या

संकेतस्थळाचा (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही

आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी केले.

यावेळी राज्य सेवा हक्क आयुक्त, नाशिक कार्यालयाने सन 2023-24 व 2024-25 या कालावधीत केलेल्या

कामकाजाच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande