
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मौजे सोमठाणा खुर्द या गावाचे पुनर्वसन सन 2013-14 मध्ये करण्यात आले असून, या गावातील 42 शेतमुल्यांकनधारक व 21 वनहक्कधारक यांना आता नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेतीची एक पट रक्कम व त्यावरील 30 टक्के दिल्याचा रक्कम अदा करण्यात आलेले आहे. भूसंपादन कायदा 2013 नुसार, मौजे सोमठाणा खुर्द येथील 42 शेतमल्यांकनधारक व 21 हक्क धारक यांच्यासाठी निधी उपलब्ध झाला असून शेतमुल्यांकन व वन हक्कधारक यांना शेतीचा मोबदला रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग यांनी यासंदर्भात माहिती दिली असून उर्वरित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे.
मौजे सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसन अधिनियम 1999 च्या तरतुदींनुसार झाले होते. सुरुवातीला शासन निर्णयानुसार 42 शेतमुल्यांकनधारक व 21 वनहक्कधारक यांना शेतीच्या मूल्यांकनाची 1 पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाचा भूसंपादन अधिनियम 2013 लागू झाल्याने आणि नवीन धोरणानुसार जमिनीचा मोबदला वाढीव दराने मिळणे अपेक्षित असल्याने, आता या लाभार्थ्यांना मुल्यांकनाच्या 4 पट रक्कम देय ठरली आहे. त्यानुसार, यापूर्वी अदा केलेली 1 पट रक्कम व 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरित मोबदला वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
काही लाभार्थ्यांना यापूर्वीच रक्कम अदा करण्यात आली आहे, परंतु उर्वरित शेतमुल्यांकनधारक व वनहक्कधारकांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. यामुळे प्रशासनाला देय रक्कम वितरित करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी संबंधित लाभार्थ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक पासबुकची छायाप्रत, शेतीचा 7/12 उतारा आणि मूळ खातेदार मयत असल्यास वारस प्रमाणपत्र व वारसाच्या बँक खात्याची छायाप्रत अकोट वन्यजीव विभाग कार्यालयात तात्काळ जमा करावी. लाभार्थ्यांची नावनिहाय यादी महाराष्ट्र वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला प्रलंबित मोबदला प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन अकोट वन्यजीव विभाग उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी