
सोलापूर, 17 डिसेंबर (हिं.स.)शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत कलह व मतभेद काही केल्या मिटण्याची चिन्हे नाहीत. ऐन महापालिका निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वाद दैनंदिन चव्हाट्यावर येत आहेत. काहींनी पक्ष सोडून गद्दारी केली असली, तरी प्रा. अजय दासरी हे पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी करत आहेत, असा खळबळजनक आरोप युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांनी केला आहे.
जिल्हाप्रमुख दासरी यांना घरचा आहेर देतानाच खंदारे यांनी, दासरी यांनी युवती सेनेत लुडबूड करू नये, असा थेट वार केला आहे. लवकरच पक्षातून दासरींना नारळ देण्यात येईल, असा खळबळजनक दावा देखील खंदारे यांनी केला आहे. युवती पदाधिकाऱ्यांना धमकावल्याचा दावाही त्यांनी केला. प्रा. अजय दासरी यांनी पक्षातील युवती पदाधिकाऱ्यांना माझ्यासोबत (खंदारे यांच्यासोबत) काम न करण्याची तंबी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड