
सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.) - सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला साडेतीन हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. बाजारात २६१ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. सरासरी भाव प्रतिक्विंटल १७०० रुपये होता.अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १४ हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. पावसाळ्यात काही दिवस शेतातून पाणी वाहिल्याने कांदा जागेवरच खराब झाला. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत येणारा कांदा ६० टक्के खराबच होता. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळत होता. सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत होता, पण आता दोन दिवसांपासून १६०० ते १७०० रुपयांचा भाव स्थिर आहे.
दरम्यान, निर्यातीच्या निर्बंधामुळे दोन वर्षापासून कांद्याच्या भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जपून ठेवला. पण, अपेक्षित भाव मिळाला नाही. खरीप कांद्याच्या काढणी हंगामाला सुरुवात झाल्यानंतरही सुरुवातीला चांगला दर मिळाला नाही. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात काहीअंशी सुधारणा झाली आहे.पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील हरिभाऊ शिरसाट यांच्या कांद्याला साडेतीन हजारांचा उच्चांकी दर मिळाला. त्यांच्या ३५ क्विंटलपैकी दहा क्विंटल कांदा त्या भावाने विकला गेला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड