अमरावती - युवा स्वाभिमान पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४३८ इच्छुक उमेदवारांची अर्ज उचल पूर्ण
अमरावती, 17 डिसेंबर, (हिं.स.) - येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान पार्टीकडून लढण्यास इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या अर्ज उचल प्रक्रियेत एकूण ४३८ इच्छुक उमेदवारांनी अर्जाची उच
महानगरपालिका निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४३८ इच्छुक उमेदवारांची अर्ज उचल पूर्ण


अमरावती, 17 डिसेंबर, (हिं.स.) - येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान पार्टीकडून लढण्यास इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या अर्ज उचल प्रक्रियेत एकूण ४३८ इच्छुक उमेदवारांनी अर्जाची उचल केली असून, निर्धारित अंतिम तारीख संपुष्टात आल्याने ही प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही नव्या इच्छुक उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अर्ज उचलता येणार नसल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

अर्ज उचल प्रक्रियेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे पक्षात निवडणूक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आ. रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, पुढील टप्प्यात उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार दि. १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी अर्ज उचललेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखती निवडणूक मुलाखत समितीमार्फत पार पडणार असून, या समितीत राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनीलजी राणा, प्रा. अजयजी गाडे, नंदेशजी अंबाडकर, शैलेंद्रजी कस्तुरे, जयंतराव वानखडे, हरिषजी चरपे, कमलकिशोरजी मालानी, शिवदासजी घुले, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, ज्योती सैरिसे, संजय मुनोत, मनोज चांदवानी, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, गंगाधर आवारे, बाळू इंगोले व अवी काळे यांचा समावेश आहे.

या मुलाखतीनंतर युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ठोस तयारी सुरू केली असून, शहराचा विकास, युवकांचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande