
सोलापूर, 17 डिसेंबर (हिं.स.)पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाला यश आले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम वेळेत दिली नाही, त्या साखर कारखान्या कडून वार्षिक १५ टक्के व्याज वसूल करून शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर सह संचालकांनी दिले आहेत. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांच्या तपासणी वेळी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीचा उसाचा दर चार हजार रुपये प्रतिटन त्वरित जाहीर करावा, धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शासनाने दखल घेत, देशमुख यांच्या विविध मागण्यांना मान्यता दिली आहे.या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जनहीत शेतकरी संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यां सह शेतकरी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड