
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।
सर्वाधिक काळ चालणारी विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी तेथील मंदिर कार्यालयामध्ये विशेष नियोजन व आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. यामध्ये वाहतूक नियंत्रण, पार्कींगस्थळ, खाद्य पदार्थ आणि पाण्याची शुद्धता, फिरते दवाखाने आदींचा समावेश आहे. येत्या शनिवारपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तब्बल दीड महिन्यांपर्यंत ही यात्रा चालते. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यादृष्टीने समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि स्वच्छता राखण्यावरही यावेळी विशेष भर देण्यात आला.
बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, गटविकास अधिकारी डॉ नीलेश वानखडे, उपविभागीय महसूल अधिकारी बळवंत अरखराव, एबीडीओ गणेश घोगरकर, यात्रा व्यवस्थापक रामेश्वर रामागड व इतर उपस्थित होते.
{अन्न व औषधी प्रशासन विभागाने सर्व खानावळींची नियमित तपासणी करावी आणि स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याची खात्री करावी, अशा सूचना दिल्या. {वाहतूक व पार्किंग- शनिवार आणि रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलीस विभागाला विशेष पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. {माकडांचा बंदोबस्त व सुरक्षा- यात्रेचे ठिकाण जंगल परिसराजवळ असल्याने माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. वीज आणि पाणीपुरवठा- यात्रेच्या काळात अखंडित वीजपुरवठा रहावा, यासाठी विद्युत विभागाने खबरदारी घ्यावी तसेच पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. {आरोग्य सुविधा- यात्रा काळात आरोग्य विभागाने तात्पुरते दवाखाने आणि २४ तास रुग्णवाहिका तैनात ठेवावी. ''स्वच्छ बहिरम'' अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. यात्रेच्या काळात कुठेही अस्वच्छता होणार नाही आणि प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी