
मुंबई, १८ डिसेंबर (हिं.स.) : शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री, महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांत्वना दिली.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, रामभाऊंच्या निधनाने जागतिक कीर्तीचा कलाकार आपल्यातून निघून गेला. प्रमाणबद्धता आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो. अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला. स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. शंभराव्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे संसद भवन परिसरात उभे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी