
मुंबई, १८ डिसेंबर (हिं.स.) : धुळे जिल्ह्याचे सुपुत्र जगप्रसिद्ध शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे आज नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाक्षेत्रात मोठी हानी झाली असून त्याच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दांत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
राम सुतार यांनी आपल्या प्रतिभासंपन्न, समर्पित आणि प्रामाणिक कलाकर्तृत्वातून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक अजरामर शिल्पकृती निर्माण केल्या. जगातील सर्वोत्तम शिल्पकला साकारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आयुष्यभर अविश्रांतपणे कला क्षेत्राची सेवा केली. अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारताना त्यांनी अपार मेहनत, धैर्य आणि अद्वितीय समर्पण दाखवले.
भगवान बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महान विभूतींच्या मूर्ती त्यांनी अत्यंत जिवंत आणि चित्तवेधक शैलीत साकारल्या. त्यांच्या या अद्वितीय शिल्पकलेमुळे देशासह धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. असे मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी