
मुंबई, १८ डिसेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले.गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता.आणि अभिजात भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.
राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते.एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयतेने, आपुलकीने बोलत.साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांचे निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे.त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी