छ. संभाजीनगर - शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्केटिंग सहाय्य व सेवा योजनेअंतर्गत प्रायोजित गांधी शिल्प बाजार (हस्तशिल्प प्रदर्शनी) चे आयोजन बलनाथ ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय से
शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल


छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्केटिंग सहाय्य व सेवा योजनेअंतर्गत प्रायोजित गांधी शिल्प बाजार (हस्तशिल्प प्रदर्शनी) चे आयोजन बलनाथ ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा सात दिवसीय गांधी शिल्प बाजार 22 डिसेंबर 2025 या कालावधीत पाटीदार भवन, जालना रोड येथे भरविण्यात आला आहे.

या प्रदर्शनीचे उद्घाटन गरवारे कम्युनिटी सेंटरचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांनी केले.तसेच न्यू इंडिया इन्शुरन्सचे मिलिंद दामोदरे विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय, हस्तशिल्प सेवा केंद्र सहायक संचालक अमन कुमार जैन, भारत पर्यटन विभागाच्या सहायक संचालक मालती दत्ता, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली काडेरेकर उपस्थित होत्या.

गांधी शिल्प बाजारात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, नवी दिल्ली व राजस्थान आदी विविध राज्यांतील हस्तशिल्प कारागीर सहभागी झाले असून त्यांनी आपल्या हस्तशिल्प वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडणी केली आहे. तसेच विदर्भ विभाग आणि सोलापूर येथील विविध हातमाग विणकरही या उपक्रमाचा भाग आहेत.

उद्घाटनप्रसंगी खंडेराव कला मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात दिलीप खंडेराव व अजय शेंडगे यांनी सहभाग घेतला. इंडिया टुरिझम, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक सादरीकरणात मराठी लोकशैलीतील गणेश वंदना, कथक व ओडिसी नृत्य तसेच लावणीचा समावेश होता.

प्रदर्शनात कढाई काम, कांथा, ज्यूट शिल्प, चन्नापटना, लाकडी खेळणी, बनारसी साड्या, धातु शिल्प, बांबू शिल्प, जामदानी, सोलापूर सुती वॉल हॅंगिंग, जळगाव येथील धातु नक्षीकाम, राजस्थानची टाय-अँड-डाय, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल येथील कृत्रिम दागिने, मोजडी, अजंता पेंटिंग तसेच विविध चित्रकला शिल्पांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये विदर्भातील विणकरांच्या हातमाग उत्पादनांचाही समावेश आहे.

गांधी शिल्प बाजार हा कला प्रेमी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून दि.22 डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाटीदार भवन, जालना रोड येथे पाहण्यासाठी व खरेदीसाठी उपलब्ध आहे. या उपक्रमामार्फत हस्तशिल्प कारागीर व विणकरांना आपले कौशल्य सादर करण्याची व व्यवसाय रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande