अमरावती : रेशनकार्डधारकांच्या उत्पन्नाची होणार छाननी
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। स्वस्तधान्य दुकानातून धान्याची उचल करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करण्यात येणार आ
रेशनकार्डधारकांच्या उत्पन्नाची होणार छाननी:जिल्हाभरात पुरवठा विभागाने शोधमोहीम केली सुरू‎


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।

स्वस्तधान्य दुकानातून धान्याची उचल करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करण्यात येणार आहे. अपात्र शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक रेशनकार्डधारक कुटुंबीयांने आतापर्यंत किती वेळा धान्याची उचल केली, त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याची सखोल पडताळणी केली जात आहे. यासाठी सर्व कुटुंबांकडून उत्पन्नाचा दाखला घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीनंतर शिधापत्रिका पात्र की अपात्र, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून धान्याचे वितरण केले जाते. मात्र, काही आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थींनीही शिधापत्रिकांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेशन दुकानांवरील कार्डांची संख्या वाढली असून, धान्याचा कोटाही वाढवावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, आता धान्याची उचल करणारे प्रत्येक कुटुंब खरोखरच पात्र आहे का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही शोधमोहीम प्रत्येक तहसील स्तरावर राबवण्यात येणार आहे.

गावपातळीवर शिधापत्रिकाधारकांची तपासणी केली जाणार आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांना अर्ज देण्यात आले असून, त्यासोबत उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

शिधापत्रिकांची व्यापक पडताळणी अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेत जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील सर्व कार्डधारकांची तपासणी केली जाणार आहे. याचा सविस्तर अहवाल प्रथम तालुकास्तरावर व त्यानंतर जिल्हास्तरावर पाठवला जाणार आहे. या कारवाईमुळे अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande