
लातूर, 18 डिसेंबर (हिं.स.)। अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचा 'गलथान' कारभार; बाळंतपणादरम्यान नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
धानोरा (खुर्द) येथील एका २३ वर्षीय नवविवाहितेचा पहिल्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (आम्र) नोंद करण्यात आली आहे.
दिपाली दयानंद वाघमारे (वय २३, रा. धानोरा खुर्द, ता. अहमदपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. दिपाली यांना पहिल्या बाळंतपणासाठी १५ डिसेंबर २०२५ रोजी अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. १६ डिसेंबर रोजी दुपारी १२:२५ च्या सुमारास त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लातूर येथील डॉ. आदित्य कल्याणी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
नातेवाईकांचा संताप आणि आरोप
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर योग्य उपचार न केल्याने दिपाली यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्ण गंभीर असतानाही योग्य व्यवस्थापन झाले नाही, हा सर्व प्रशासनाचा गलथान कारभार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया धानोरा खुर्द ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती उशिराने प्राप्त झाल्यामुळे १७ डिसेंबर रोजी अहमदपूर पोलीस ठाण्यात आ.म्र.नं. ८६/२०२५, कलम १९४ BNSS नुसार नोंद करण्यात आली पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्मिता जाधव करीत आहेत.
** चौकशीनंतरच सत्य समोर येईल! **
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, बाळंतपणासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी 'जिल्हास्तरीय माता मृत्यू अन्वेषण समिती' (Maternal Death Surveillance and Response Committee) मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि खरे कारण स्पष्ट होईल.
— डॉ. बाळासाहेब नागरगोजे
(वैद्यकीय अधीक्षक, शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर)
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis