
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)।मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराच्या घरी जाऊन कारची काच फोडून घराच्या बाहेरील कुंड्या फेकून नुकसान केल्याची घटना जनरल वैद्यनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक जगन्नाथ सोनवणे (रा. श्याम सदन, वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर, नाशिक) हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत. त्यांचा मुलगा नितीन याने सवर्ण मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे.
त्याचा राग मनात धरून मुलीचे वडील कैलास जाधव यांनी नितीन सोनवणे व फिर्यादीच्या पत्नीला फोन करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच अशोक मार्ग सिग्नलजवळ आरोपी कैलास जाधव यांनी फिर्यादीची गाडी अडवून सुनेला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करून मोठमोठ्याने ओरडून जातिवाचक शिवीगाळ करून धमकावले, तसेच इतर आरोपी संदीप नामदेव जाधव, उज्ज्वला संदीप जाधव, शालिनी संदीप जाधव, यश संदीप जाधव, अक्षय राजेंद्र घुमरे (सर्व रा. एसएसडीनगर, हिरावाडी, पंचवटी व इतर अनोळखी इसमांनी संगनमत करून फिर्यादीची एमएच १५ जीए ७३१२ या क्रमांकाच्या एटिंगा गाडीची पाठीमागील काच व ड्रायव्हर बाजूकडील चालकाच्या दरवाजाचा साईड ग्लास फोडला, तसेच घराबाहेरील झाडांच्या कुंड्या गेटच्या आवारात फेकून, तसेच बाहेरचे गोल दिवे फोडून नुकसान केले. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध अॅट्रोसिटीसह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुरडकर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV