हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे
सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.) राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलिसांनी सतत कारवाई करूनही जिल्ह्यातील हातभट्ट्या पूर्णत: विझलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जागेत हातभट्टी आहे, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कारवाईवेळी ती जमीन त
हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे


सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)

राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलिसांनी सतत कारवाई करूनही जिल्ह्यातील हातभट्ट्या पूर्णत: विझलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जागेत हातभट्टी आहे, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कारवाईवेळी ती जमीन तथा जागा कोणाची, याची माहिती तलाठ्यांकडून घेऊन त्या मालकावरच गुन्हे दाखल होतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र शासनाने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जून २०२५ मध्ये उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे देशी-विदेशी दारू आणि बिअरच्या किंमत वाढल्या आहेत. विशेषतः भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवरील उत्पादन शुल्क तीन पटीवरून साडेचार पटीपर्यंत वाढले आहे. देशी-विदेशी दारुची विक्री घटली असून अनेकजण हातभट्टीच्या नादी लागले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा, शिवाजी नगर, तळे हिप्परगा, गुळवंची, दोड्डी यासह अन्य ठिकाणी हातभट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरील कारवाई वाढविली आहे. पथकाने मंगळवारी दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर हातभट्टीसाठी मळी घेऊन जाणारा पिकअप पकडला. दुसरीकडे शिवाजी नगर व गुळवंची येथील हातभट्यांवरही छापेमारी केली. दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande