जि.प. निवडणूक जाहीर होण्याआधीच इच्छुकांचा नवा फंडा; मतदारांसाठी देवदर्शन–पर्यटन यात्रांचा ट्रेंड
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. निवडणूक कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच अनेक इच्छुकांनी पारंपरिक प्रचाराला फाटा दे
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच इच्छुकांचा नवा फंडा; मतदारांसाठी देवदर्शन–पर्यटन यात्रांचा ट्रेंड


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. निवडणूक कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच अनेक इच्छुकांनी पारंपरिक प्रचाराला फाटा देत निवडणुकीचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. मतदारांना थेट देवदर्शन व पर्यटन यात्रांना नेण्याचा फंडा सध्या जिल्हा परिषद गटांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

निवडणुका लांबत चालल्याने अनेक मध्यम आर्थिक क्षमतेच्या इच्छुक उमेदवारांचे खर्च वाढत असून, प्रचारासाठी केलेल्या खर्चामुळे त्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांनी या परिस्थितीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा घेतला आहे. निवडणूक कितीही लांबली तरी खर्चाची तमा न बाळगता त्यांनी मतदारांशी जवळीक वाढविण्यासाठी दर्शनयात्रांचा मार्ग अवलंबला आहे. परिणामी, जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये सध्या “निवडणूक प्रचार” कमी आणि “दर्शनयात्रा” अधिक दिसून येत आहेत.

इच्छुक उमेदवार गटातील महिलांसह पुरुष मतदारांना शेगाव, शिर्डी, नाशिक-त्र्यंबकेश्वर, तुळजापूर येथील तुळजाभवानी, कोल्हापूर, अंबादेवी तसेच वणीच्या सप्तश्रृंगी देवी अशा विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी घेऊन जात आहेत. काही ठिकाणी पर्यटनाची जोड देत ही यात्रा अधिक आकर्षक करण्यात येत आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गटातील गावांचे मतदार या दर्शनयात्रांचा लाभ घेत असल्याने सध्या संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.मतदारांना दर्शनासाठी नेण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. महिलांना लालपरीत अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत असल्याने खर्चही तुलनेने कमी पडतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी हा प्रचाराचा स्वस्त आणि प्रभावी मार्ग ठरत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे सर्व पर्याय इच्छुकांकडून वापरले जात आहेत.दरम्यान, निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात झाल्यास खर्च किती वाढेल, याचीही चिंता इच्छुकांना सतावत आहे. त्यामुळे अनेकांना आता लवकरात लवकर निवडणुका जाहीर व्हाव्यात, असे वाटू लागले आहे. आयोगाकडून तयारी झाली असली तरी निवडणूक जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक कायम असून, तोपर्यंत दर्शनयात्रांचाच ट्रेंड सुरू राहणार, असे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande