
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। पनवेलमध्ये गुलाबी थंडीचा प्रभाव वाढत असताना उघड्यावर राहणाऱ्या निराधार गरजूंना दिलासा देण्यासाठी सह्याद्री सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या या संस्थेने कडाक्याच्या थंडीत पदपथावर, रस्त्याच्या कडेला, उघड्या आकाशाखाली तसेच उड्डाण पुलाखाली राहणाऱ्या गरजूंना ब्लँकेट व चादरींचे वाटप करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आयु. नंदकुमार कांबळे यांनी सांगितले की, योग्य नियोजन करून सलग एक आठवडा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटेपर्यंत दररोज सुमारे ५० ब्लँकेट व चादरींचे वाटप केले. थंडीच्या तीव्रतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वाटप कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस सचिन सावंत, कार्याध्यक्ष सुजित मोहिते, कोषाध्यक्ष रुपाली पवार, सल्लागार समाधान सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कडाक्याच्या थंडीतही रात्रीच्या वेळेत साहित्य घेऊन कार्यकर्ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. पनवेल परिसरातील आकुर्ली, सुकापूर, शिवा कॉम्प्लेक्स नाका, नवीन पनवेल पूल, जुना पनवेल पूल, पनवेल बस स्थानक व पनवेल रेल्वे स्थानक आदी ठिकाणी जाऊन गरजूंना थेट मदतीचा हात देण्यात आला.
सह्याद्री सामाजिक संस्था मागील पाच वर्षांपासून पनवेलमधील महिला व बाल आश्रम, तसेच वृद्धाश्रमांतील निराधारांसाठीही जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत आहे. दरवर्षी नवनवीन सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेच्या कार्याची दखल घेत पनवेलमधील नागरिकांनी संस्थेचे स्वागत व अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके