

अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) : आगामी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, त्याच अनुषंगाने अमरावती पोलिस आयुक्त राकेश ओला व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील महत्त्वाच्या मतगणना केंद्रांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीमध्ये मतगणना स्पोर्ट कॉम्प्लेक्स तसेच सांस्कृतिक भवन व निवडणूक निर्णय अधिकारी 2 यांचे नविन तहसिल कार्यालय या ठिकाणांचा समावेश होता.या पाहणीदरम्यान दोन्ही आयुक्तांनी मतमोजणीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची तपासणी केली. मतगणना केंद्रात प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था तपासण्यात आली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा विशेष आढावा घेण्यात आला.पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी मतगणना केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, अतिरिक्त पोलिस फौजफाटा, दंगा नियंत्रण पथक तसेच त्वरित प्रतिसाद देणाऱ्या पथकांची तैनाती करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून कोणतीही अनुचित घटना खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतगणना केंद्रांवरील मूलभूत सोयी-सुविधांवर भर दिला. वीजपुरवठा, पाणी, स्वच्छता, अग्निसुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय मदत तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मतगणना प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.या पाहणीप्रसंगी निवडणूक विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात आणि मतगणना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या.प्रशासनाकडून मतगणनेसाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नागरिकांनीही शांतता व सहकार्य राखावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस व महानगरपालिका यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी