जीपीएस ट्रॅकिंगद्वारे पोलिस बंदोबस्तावर वरिष्ठांची नजर
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत की नाही, यावर आता जीपीएस ‘ट्रॅकिंग’द्वारे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने हा नवा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सु
जीपीएस ट्रॅकिंगद्वारे पोलिस बंदोबस्तावर वरिष्ठांची नजर


रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत की नाही, यावर आता जीपीएस ‘ट्रॅकिंग’द्वारे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने हा नवा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला असून, येत्या महिन्याभरात तो पूर्ण क्षमतेने राबवण्याची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणे, ठरावीक जागा सोडून अन्यत्र थांबणे, अशा प्रकारांना आळा बसणार आहे.

पनवेल परिसरात झपाट्याने होत असलेल्या विकासाच्या तुलनेत पोलिस मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रण, दैनंदिन बंदोबस्ताचे नियोजन तसेच वाहतूक व्यवस्थापन करताना अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. काही वेळा बंदोबस्तावर नेमलेले कर्मचारी कर्तव्यावर नीट हजर नसल्याने गुन्हेगारीवर अपेक्षित नियंत्रण राहत नाही. रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती दिसली तरी गुन्हेगारी कृत्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसतो, हे लक्षात घेता ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.

जीपीएस ट्रॅकिंगमुळे संबंधित कर्मचारी नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत, किती वेळ तिथे कार्यरत आहेत, याची माहिती थेट आयुक्तालयात उपलब्ध होणार आहे. विशेषतः राज्यात किंवा राज्याबाहेर गुन्हेगारांच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित पथकाचा ठावठिकाणा तत्काळ समजणार आहे.

नाकाबंदी, वाहतूक नियंत्रण तसेच विशेष बंदोबस्ताच्या वेळी कोणत्या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत, याचे अचूक नियोजन जीपीएस ट्रॅकिंगद्वारे करता येणार आहे. यामुळे गुन्हेगारांना पळून जाण्याच्या मार्गांवर वेळीच नियंत्रण ठेवता येईल. तसेच वाहतूक कोंडीसारख्या समस्या सोडवण्यासाठीही या प्रणालीचा प्रभावी वापर होणार आहे. एकूणच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे पोलिसांच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande