
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) : पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार सांभळताच बुधवारी शहरातील सर्व वरली मटका चालकांची पेशी घेतली. मात्र मुख्य मटका किंगने स्वतः ऐवजी हस्तकाला पाठवीले होते. आयुक्तांनी त्या हस्तकाला चांगलेच लाल केले. या पेशीदरम्यान बंद दरवाज्यातून बाहेर पट्ट्याचा आवाज येत होता. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सायंकाळी भाजीबाजार येथे पवन वानखडे यांच्या हत्येच्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच पूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर खोलापुरीगेट ठाण्याची पाहणी केली आणि तपास अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. बुधवारी आयुक्त कार्यालयातील कामकाजाची माहित घेतल्यानंतर शहरातील सर्व वरलीमटका चालकांची फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गुन्हेशाखेच्या कार्यालयात पेशी घेतली. यावेळी शहरातील २० ते २५ वरलीमटका चालक हजर झाले होते. प्रत्येकाला आत बोलावून त्यांची पूर्ण माहिती आयुक्तांनी घेतली आणि यापूढे शहरात वरलीमटका सूरू करायचा नाही, असे स्पष्ट बजावले. यावेळी शहरातील मुख्य वरलीमटका चालक हजर नव्हते, त्यांनी आपल्या हस्तकांना पाठविले होते. वरलीमटका किंग न आल्यामुळे आयुक्तांनी हस्तकालाच लाल केले. त्यावेळी बंद दरवाज्यातून पट्ट्याचा आवाज बाहेर येत होता. एका मागे एक प्रत्येकाला बोलाविले जात होते. नंबर आला तो आत जात होता, मात्र बाहेर येतांना दोन्ही हात चोळत बाहेर येत होता आणि खाली मान टाकून उभा राहत होता. हा प्रकार पाहून वरलीमटका चालक मोठ्या हिमतीने एक दुसऱ्याच्य चेहऱ्याकडे पाहत होते आणि आत जात होते. सुमारे एक ते दिड तास पेशी चालली. शहरात वरलीमटका चालणार नाही, असे आयुक्तांनी सक्तपणे बजावले. पोलीस आयुक्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील वरलीमटका चालकांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून आले. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी