
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोशल मीडियावर शस्त्रासह फोटो अपलोड करून दहशत पसरवणाऱ्या एका इसमास घातक शस्त्रासह ताब्यात घेऊन प्रभावी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेस गुप्त माहिती मिळाली होती की, एक इसम गेल्या काही दिवसांपासून शस्त्रासह इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून ते सोशल मीडियावर प्रसारित करीत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार सदर इसम जेवड नगर, अमरावती येथे शस्त्रासह उभा असल्याचे कळताच, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून अभिषेक उध्दव मेश्राम (वय २४ वर्षे, रा. जेवड नगर, अमरावती) यास ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून एक चायना चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ तसेच म.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.सोशल मीडियाचा गैरवापर करून शस्त्रप्रदर्शनाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अमरावती शहर गुन्हे शाखेकडून देण्यात आला आहे.सदर ची कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब, अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी