एका बटणावर कापडी पिशवी! अलिबाग नगरपरिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्लास्टीक वापराला आळा घालण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आता बाजारात खरेदीसाठी जाताना नागरिकांना केवळ दहा रुपयांत कापडी पिशवी मिळणार असून, तीही एका ब
एका बटणावर कापडी पिशवी! अलिबाग नगरपरिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम


रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)।

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्लास्टीक वापराला आळा घालण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आता बाजारात खरेदीसाठी जाताना नागरिकांना केवळ दहा रुपयांत कापडी पिशवी मिळणार असून, तीही एका बटणावर. नगरपरिषदेच्या वतीने कापडी पिशवी विक्रीसाठी विशेष मशीन उपलब्ध करण्यात येत असून, शहरातील पाच ठिकाणी ही मशीन बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकचा वापर होत असल्याचे चित्र होते. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. याची दखल घेत अलिबाग नगरपरिषदेने प्लास्टीक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील हॉटेल्स, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, शू मार्टसह विविध व्यावसायिक आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.

मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, प्रकाश तांबे, सुमित गायकवाड, मुकादम तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६९ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असून, यामध्ये प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित कारवाईतून ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कठोर कारवाईमुळे प्लास्टीक वापरणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

नागरिकांना कापडी पिशवीची सवय लागावी आणि प्लास्टीकमुक्त अलिबाग साकार व्हावे, यासाठी नगरपरिषदेने कापडी पिशवी विक्री मशीनचा उपक्रम सुरू केला आहे. बाजारपेठा व वर्दळीच्या ठिकाणी ही मशीन लावण्यात येणार असून, त्यामुळे भाजीपाला, मांसाहार तसेच इतर खरेदीसाठी प्लास्टीकच्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यासोबतच प्लास्टीकमुक्त अलिबागसाठी जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी फलक लावणे, पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे असे विविध उपक्रम नगरपरिषदेच्या वतीने राबवले जात असून, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande