राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, 18 डिसेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाने एक दिग्गज कलाकार गमावला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले आहे. राम सुतार यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित कलासाधनेतून
राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली


मुंबई, 18 डिसेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाने एक दिग्गज कलाकार गमावला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले आहे.

राम सुतार यांनी आपल्या दीर्घ आणि समर्पित कलासाधनेतून भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या शिल्पांमधून भारतीय इतिहास, संस्कृती आणि महान व्यक्तिमत्त्वे सजीव स्वरूपात साकारली गेली. सरदार वल्लभभाई पटेल यांची ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, तसेच देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण स्मारके ही त्यांच्या अद्वितीय प्रतिभेची साक्ष देतात.

राम सुतार यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. नुकताच त्यांना राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, ही बाब राज्यासाठी आणि कला क्षेत्रासाठी अत्यंत गौरवास्पद असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

राम सुतार यांचे निधन ही कला क्षेत्रासाठी मोठी हानी असून, त्यांच्या कलाकृतींमधून त्यांचे कार्य आणि स्मृती सदैव जिवंत राहतील, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटले आहे.

या दुःखद प्रसंगी राज्यपालांनी राम सुतार यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त केल्या असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande