
ठाणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रणजित मोहन यादव (भा.प्र.से., २०२२ बॅच) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज, दि. १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला.
यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे (भा.प्र.से.) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मनोज रानडे यांनी हा अतिरिक्त कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळला.
पदभार स्वीकारताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, विकासाभिमुख करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी प्रशासनात कार्यक्षमता, वेळबद्धता आणि फलनिष्पत्ती करण्यासाठी भर देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व बालकल्याण आदी विभागांमध्ये समन्वय साधून तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकारक प्रशासन राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यावर तत्काळ व सकारात्मक कार्यवाही केली जाईल, तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य, अनुभव आणि नवकल्पनांचा योग्य उपयोग करून ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाला नवे बळ देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी रणजित यादव सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली या पदावर कार्यरत होते.
उल्लेखनीय कार्य
गडचिरोली जिल्ह्यातील ‘आदि कर्मयोगी’ अभियानांतर्गत जिल्ह्याला माननीय राष्ट्रपती महोदयांकडून उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरव मिळण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच चामोर्शी एम.आय.डी.सी., रेल्वे व सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादन, ‘पीएम जनमन’, ‘धरती आबा अभियान’ यांसारख्या आदिवासी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ई-ऑफिस व ई-गव्हर्नन्स उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग संजय बागुल तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर