केळवेरोडचा अमोल बातरा भारतीय सैन्यात दाखल; गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)। केळवेरोड परिसरातील वाकसाई गरोडा पाडा येथील अमोल विजय बातरा या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून त्याने खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सैन्यात रुजू होण्याचे स्वप्न साकार केले आहे. अमोलचे माध्यमिक शिक्षण केळ
केळवेरोडचा अमोल बातरा भारतीय सैन्यात दाखल; गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत


पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)।

केळवेरोड परिसरातील वाकसाई गरोडा पाडा येथील अमोल विजय बातरा या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून त्याने खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सैन्यात रुजू होण्याचे स्वप्न साकार केले आहे. अमोलचे माध्यमिक शिक्षण केळवेरोड येथील विद्या वैभव विद्यालय येथे झाले आहे.

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही “देशासाठी काहीतरी देणं लागतो” या दृढ निश्चयाने अमोलने भारतीय सैन्यात जाण्याचा संकल्प केला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने सैन्याचे कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सध्या त्याची नियुक्ती उत्तराखंडमधील देहरादून येथे झाली आहे.

आपल्या मायभूमी केळवेरोड येथे प्रथमच आगमन होताच अमोलचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. हार-फुलांच्या वर्षावात त्याचे अभिनंदन करण्यात आले. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी केळवेरोड रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून या जवानाला सॅल्यूट करून गौरव केला, हे दृश्य उपस्थितांसाठी अभिमानास्पद ठरले.

या आनंददायी प्रसंगी वाकसाई गावाचे उपसरपंच अतुल हाडळ, मायखोप ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र किणी, तसेच स्वप्नील भोईर, प्रतीक चिपाट, संजय रिंजड, विनोद ह. किणी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी अमोल बातरा याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या देशसेवेबद्दल अभिमान व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande